www.24taas.com, नवी दिल्ली
भाजपचे माजी अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना एक लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने आज दोषी ठरवले आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीच्या विशेष सीबीआयच्या न्यायालयात उद्या शनिवारी शिक्षेबाबत फैसला होणार आहे.
२००१ मध्ये बंगारु लक्ष्मण यांनी एक लाखांची लाच स्वीकारली होती. याबाबत न्यूज वेबसाइट तहलका डॉट कॉम ने १३ मार्च स्टिंग ऑपरेशन केले होते. याची व्हिडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली होती. बंगारु लक्ष्मण यांनी खोट्या सौद्यासाठी एक लाखांची लाच दिली होती. याप्रकरणी एनडीएचे सरकार हादरले होते. भाजपच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा बंगारू यांना तर संरक्षण मंत्री पदाचा जॉर्ज फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात जया जेटली यांचे नावही आले होते.
दरम्यान, काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचारप्रकरणी आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी म्हणालेत, भ्रष्टाचारविरोधात लढण्याचे नाटक करणाऱ्या भाजपचे खरे रूप समोर आले आहे. बंगारू यांच्या शिक्षेबाबत शनिवारी फैसला होणार आहे. त्यामुळे बंगारु यांना काय शिक्षा होणार याकडे लक्ष लागले आहे.