www.24taas.com, नवी दिल्ली
सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनत दिसून येत आहे. त्यामुळे मला पुन्हा दिल्लीत जंतर मंतरवर उपोषण करावे लागेल, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. तर विरोधकांनी सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे म्हणणे आहे की, सक्षम लोकपाल येईल.
सक्षम लोकपाल विधेयकासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्ही जनजागरण करीत असून सरकारवर दबाव निर्माण करीत आहे. ही संयुक्त सामाजिक गरज आहे. सरकारने संसदेत सक्षम लोकपाल विधेयक मांडायला हवे. या विधेयकात संशोधन करण्याचा सरकार विचार करीत असेल तर ही समाधानकारक बाब आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी बहुमत हवे असेल तर सरकारकडे ते आहे. त्यामुळे विधेयत मंजूर करावे, असे बेदी म्हणाल्या. दरम्यान, अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, सरकारी लोकपाल बिल हे बिन कामाचे आहे. आम्ही केलेल्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागतील. अन्यथा आम्ही आंदोलनाला सज्ज आहोत.
काँग्रेस गंभीर नाही - भाजप
लोकपाल विधेयक मंजूर करण्याबाबत काँग्रेस गंभीर नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाने आज येथे केला. लोकपाल विधेयकाला मंजुरी मिळावी, अशी आमची इच्छा आहे.
मात्र, कॉंग्रेस जाणीवपूर्वक विधेयकाला मंजुरी देत नसून त्यांचा भ्रष्टाचारा प्रतिबंध घालण्याचा उद्देश नाही, अशी टीका भाजपचे राज्य सभेतील सदस्य प्रकाश जावडेकर यांनी केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेतल्यानंतर काहीच वेळात जावडेकर यांनी त्यावरील प्रतिक्रिया नोंदविली.
सरकार कटिबद्ध - पंतप्रधान
सक्षम लोकपाल विधेयकासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्यसभेच्या सर्वपक्षीय बैठकीत सांगितले. सक्षम लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या सूचना आणि उपायांचा निश्चितच उपयोग होणार आहे. आम्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलविली होती. जनमत तयार करण्याचा प्रयत्नातील हा एक भाग आहे.