श्रीलंकन टीम हल्ल्यातला दहशतवादी ठार

श्रीलंकन टीमवर २००९ साली पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यातील कथित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय. पंजाबमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी या कथित दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय.

Updated: Aug 2, 2012, 05:01 PM IST

www.24taas.com, लाहोर

श्रीलंकन  क्रिकेट टीमवर २००९ साली पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यातील कथित आरोपी पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय. पंजाबमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी या कथित दहशतवाद्याला कंठस्नान घातलंय.

 

पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी सार्वजनिक वाहनांचा वापर करून लाहोरकडे रवाना झाले होते. या माहितीवर पोलिसांनी लाहोरपासून ४०० किलोमीटर दूर गाजी घाटावरच्या ब्रिजवर नाकाबंदी केली. एका बसची चेकींग सुरू असताना अचानक एका प्रवाशानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यावर या व्यक्तीनं पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी गोळीबाराला दिलेल्या उत्तरात या व्यक्तीचा मृत्यू झालाय. ही व्यक्ती म्हणजे अब्दुल गफार केसरानी ऊर्फ सैफुल्लाह असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

सैफुल्लाहकडे एक ग्रेनेड आणि दोन बंदूका सापडल्या. ‘तहरिक ए तालिबान’ या दहशतवादी संस्थेचा तो सदस्य होता. पोलिसांच्या माहितीनुसार, बँकांवर दरोडे घालून दहशतवाद्यांसाठी पैसा गोळा करणं हेच त्याचं काम होतं. सैफल्लाहला अफगानिस्तानातून प्रशिक्षण मिळालं होतं.

 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २००९ साली लाहोर प्रांतात श्रीलंकन क्रीकेट टीमवर केल्या गेलेल्या दहशतवादी हल्ल्यात सैफुल्लाही सामील होता. या हल्ल्यात आठ लोक ठार झाले होते तर श्रीलंकेचे सात खेळाडूही या हल्ल्यात जखमी झाले होते.

 

.