www.24taas.com, औरंगाबाद
ठाणे पालिकेत शिवसेनेला बहुमत नसताना विकासाच्या मुद्यावर आणि लोकभावनेचा आदर करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. आता औरंगाबादमध्येही असाच पॅटर्न राबवून जिल्हा परिषदेवर शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या दृष्टीने एक पाऊल शिवसेनेने पुढे टाकले आहे. आता मनसे काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी युतीसोबत येण्यास मनसेला हाक दिली आहे. चंद्रकांत खैरे यांनी तसे संकेत दिल्यानंतर मनसेचे अतुल सरपोतदार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंची कृष्णकुंज इथं भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी दोन ते तीन दिवसांत याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचे संख्याबळ २३ आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना ८ जागांची गरज आहे. मनसेने आठ जागांच्या जोरावर ठाकरे पॅटर्न राबवून औरंगाबद जिल्हा परिषदेवर युतीचा झेंडा फडकण्याची चिन्हं सध्या तरी दिसून येत आहेत.