www.24taas.com, तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या चरणी २२५ किलो चांदीची मूर्ती आणि पावणे दोन किलो सोन्याचे अलंकार अर्पण करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पुण्यातल्या विजय उंडाळे आणि नितीन उंडाळे यांच्याकडून तुळजाभवानीची २२५ किलो वजनाची चांदीची मूर्ती आणि पावणेदोन किलो वजनाचे सोन्याचे अलंकार देणगी स्वरुपात अर्पण करण्यात आले. उंडाळे कुटुंबीय तुळजाभवानीचे भक्त आहेत. त्यांनी अर्पण केलेली चांदीची मूर्ती ही तुळजाभवानीच्या मूळ मूर्ती प्रमाणे आहे.
तर अलंकारामध्ये ५८ तोळ्याच्या पोवळयाचा पाच पदरी हार, ५१ तोळ्यांचा लक्ष्मी हार, २५ तोळ्यांचा मुकुट मंगळसूत्र आणि नेत्र यांचा समावेश आहे. यानिमित्त मंदिराची फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं आकर्षक सजावट करण्यात आली. एखाद्या भक्तानं एवढ्या मोठ्या किमतीचे दान करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.