www.24taas.com, लातूर
लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं राज्यपाल असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो प्रचारासाठीच्या पोस्टरवर वापरला आहे. आचारसंहितेचा भंग केला असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. तर दुसरीकडं काँग्रेसन मात्र या गोष्टीचं समर्थन केलं आहे.
लातूर महापालिका निवडणूक प्रचारानिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टरवर राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचा फोटो लावण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालपद हे घटनात्मक आहे. परंतू काँग्रेसनं या पदाला राजकीय पातळीवर आणत त्यांचा मतदानासाठी आणि प्रचारासाठी वापर होत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. हा प्रकार आचारसंहितेचा भंग करणारा असल्यानं संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे.
काँग्रेसनं मात्र या गोष्टीचं जोरदार समर्थन केलं आहे. शिवराज पाटील लातूरचे असून ते घरातील सदस्याप्रमाणे असल्यामुळं पोस्टरवर त्यांचा फोटो लावणं गैर नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी सांगितलं आहे. लातूर काँग्रेसमध्ये शिवराज पाटील आणि विलासराव देशमुख असे गट आहेत. त्यामुळं एकमेकांवर कुरघोड्या करण्यात हे दोन्ही गट नेहमीच प्रयत्नशील असतात. यातूनच शिवराज पाटलांचा फोटो लावला गेल्याचं सांगण्यात येतं आहे. परंतु काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे.