Maharashtra Weather News : थंडीची चाहूल उत्तर भारतामध्ये लागलेली असली तरीही महाराष्ट्राचील काही भागांमध्ये मात्र अद्यापही थंडीची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये थंडी जोर धरताना दिसेल. तर, उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यात इतर ठिकाणी थंडीचा लपंडाव पाहायला मिळेल.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरनिर्मिती होताना दिसेल. ज्यामुळं कोकण पट्ट्यासह दक्षिण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळात राज्यातील कमाल आणि किमान तापमानाच मात्र चढ- उतार होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामानात सातत्यानं बदल होत असल्यामुळं हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं आहे. ज्यामुळं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण काहीसं ढगाळ राहील असा अंदाज वर्चवण्यात आला आहे. परिणामस्वरुप तापमानातही वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर जिल्ह्यातही काहीसं असंच हवामान पाहायला मिळेल. राज्यात थंडीचा कडाका 17 नोव्हेंबरपासून वाढणार असून, धीम्या गतीनं शीतलहरी राज्याचे विविध जिल्हे व्यापताना दिसतील. तूर्तास थंडीची प्रतीक्षा कायम असेल हेच खरं.
सध्या श्रीलंका आणि नजीकच्या सागरी क्षेत्रावर चक्राकार वारे निर्माण होऊन त्यामुळं देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टी क्षेत्रांकडे वातावरणावर गंभीर परिणाम करताना दिसत आहे. अरबी समुद्राच्या आग्नेयेकडेही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असल्यामुळं राज्यातील तापमानाच मोठ्या फरकानं चढ- उतार पाहायला मिळत आहेत.