मराठवाड्यावर पाऊस रुसलेलाच, भाज्या महागल्या

मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाडा मात्र अजूनही पावसाची वाटच पाहतोय. पावसानं मारलेली दडी, पाण्याची टंचाई आणि भाज्यांच्या लागवडीत झालेली घट यामुळे भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. गेल्या महिनाभरात भाज्यांचे भाव दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत.

Updated: Jun 28, 2012, 09:12 AM IST

www.24taas.com, औरंगाबाद  

 

मुंबईत पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाडा मात्र अजूनही पावसाची वाटच पाहतोय. पावसानं मारलेली दडी, पाण्याची टंचाई आणि भाज्यांच्या लागवडीत झालेली घट यामुळे भाज्यांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. गेल्या महिनाभरात भाज्यांचे भाव दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत. महागाई आणि दुष्काळाच्या सावटात असलेल्या सर्वसामान्य लोकांसमोर  वाढत्या भाज्यांच्या भावाचं नवं संकट उभं राहिलंय.

 

जून सरत आला तरी अजूनही पावसानं दडी मारलीए. कमी पावसाचा हा फटका आता महागाईसुद्धा पेटवू पाहतोय. भाज्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे भाव गगनाला भिडलेत. पावसानं दडी मारल्यामुळे भाजी उत्पादन घटल्याचं भाववाढ अनिवार्य असल्याचं भाजी विक्रेतेए सांगतात.  घाऊक बाजारातच भाज्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढल्यात. त्यामुळे भाज्यांचे दर दुप्पटी-तिप्पटीनं वाढलेत. पंधरा दिवसांपूर्वी ३० रुपयांना मिळणारी गवार आता ५० रुपयांना मिळतेय. २५ रुपयांना मिळणारी वांगी ४५ रुपयांना, भेंडी २५ रुपयांची ४५ रुपयांना, ८ रुपयांना मिळणारी मेथीची जुडी १५ रुपये, तर पालकाची ५ रुपयांना मिळणारी जुडी १० रुपयांना मिळतेय. या भाववाढीमुळे गृहिणीचे रोजचं बजेटचं कोलमडलंय.

 

भाज्या स्वस्त व्हाव्या म्हणून सर्वसामान्य पावसाची आतुरतेनं वाट पाहतोय. तर पेरणींची तयारी करून बसलेला बळीराजाही वरूण राजाला साकडे घालतोय. पाऊस धो-धो बरसला तरच शेतकऱ्यासह सर्वसामान्यांसमोरचं दरवाढीच संकट दूर होईल.

 

.