विष्णू भागवतांचा 'कार'नामा

भागवतच्या ताब्यातल्या तब्बल 34 गाडया पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्या मालकीच्या तब्बल 115 आलीशान गाडया असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यापूर्वीच त्याच्याकडील आलीशान ऑडीसह 20 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Updated: Oct 31, 2011, 08:04 AM IST

झी २४ तास वेब टीम, औरंगाबाद 

विमा काढण्याच्या नावावर राज्यातील हजारो लोकांना चुना लावणाऱ्या नवजीवन लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक विष्णु भागवत याचे एकाहुन एक असे धक्कादायक प्रताप उघडकीस येण्याचं अजून काही थांबत नाहीय. कोटयवधींचा गैरव्यवहार करणारा हा महाठक स्वतः महागडी आणि आलीशान ऑडी वापरतच होता, त्याचबरोबर धंदा तेजीत राहवा यासाठी एजन्ट लोकानांही कारचे अमिष दाखवत होता.

भागवतच्या ताब्यातल्या अशा  तब्बल 34 गाडया पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्या मालकीच्या तब्बल 115 आलीशान गाडया असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यापूर्वीच त्याच्याकडील आलीशान ऑडीसह 20 कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

नवजीवन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक विष्णु भागवत याने नेमका किती कोटीचा घाटोळा केलाय याचा तपास अजून सुरुच आहे. औरंगाबाद पोलिसांनी मे महिन्यात या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. विमा काढण्याच्या नावावर राज्यातील हजारो लोकांना त्याने चुना लावला आणि तोही ओरिएंटल विमा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन..  या दोन्ही कंपनीत कोणताच करार नसतानही या टोळीने विमा काढण्याच्या नावाखाली पैसे घेत हजारो नागरीकाची कोटयवधीची फसवणुक केली. ओरिएंटलच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ते हा गोरखधंदा  करीत...  हजारो बनावट प्रमाणपत्रेही त्याच्याकडुन पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणात भागवतला मदत करणाऱ्या ओरिएंटल विमा कंपनीच्या काही अधिकाऱ्यांनांही पोलिसांनी अटक केली होती.. विष्णु भागवत याच्या बोगस नवजीवन लाईफ इन्शुरन्स कंपनीला प्रोमोट करणे, तसंच नवजीवनने तयार केलेल्या ओरिएंटलच्या बनावट विमा प्रमाणपत्रावर सही करणे त्यांना शिक्के देणे आदी आरोप त्यांच्यावर आहेत. सध्या जामीनावर असलेल्या भागवत पुराणाच्या एकाहुन एक सुरस कथा अजूनही उघडकीस येत आहेत. धंदा वाढविण्यासाठी त्याने अमिषापोटी एजन्ट लोकाना कार बक्षीस म्हणून देत, अशा 34 कार आज जप्त करण्यात आल्यात. त्याच्या मालकीच्या तब्बल 115 कार आहेत. अजुन 50 कार जप्त घेणे बाकी असल्याचाही पोलिस सांगतात.

हाय प्रोफाइल राहाणीमान असलेल्या भागवत यांने विम्याच्या या व्यवसायाबरोबरच लोकांना भुरळ पडण्यासाठी सवलतीमध्ये वस्तु खरेदी करण्याची कुपन योजनाही सुरू केली होती. प्रत्येक कार्यक्रमात तो नेहमीच राजकीय पुढाऱ्यांबरोबरच वावरत असे... तो स्वतः महागडी ऑडी कार वापरत होता. त्या कारसह अन्य महागडया अशा 20 कार यापूर्वीच जप्त केल्यात.

त्याच्यावर औरंगाबादमध्येच एकुण चार गुन्हे दाखल असून एकुणच या हायप्रोफाईल आणि व्हाईट कॉलर क्राईम प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिसानी सीए, बँकिंग तसंच कंपनी सेंक्रेटरी अशा तज्ञाची तपासात मदत घेणार असल्याचं सांगितलंय.

Tags: