www.24taas.com, रत्नागिरी
कोकणी माणसाला फणसाची उपमा दिली जाते. कारण फणसाला वरून जरी काटे असले तरी आतला गोडवा हवाहवासा वाटतो. कोकणात फणसाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. गऱ्यांप्रमाणे कोकणात औषधी गुणधर्म असल्यानं फणसाला दिवसेंदिवस मागणी वाढू लागलीय.
कोकण किनारपट्टीवर फणसाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उत्पादनही भरघोस येतं. सर्वसाधारणपणे मे अखेरीस पिकलेले फणस बाजारात विक्रीसाठी आणले जातात. फणस हे केवळ फळ नसून त्यात औषधी गुणधर्मदेखील आहे. तोंड आल्यास बुंध्यावरची अळंबी उगाळून लावली जाते. फणसाची बी भाजून मधुमेह रोग्यांना १० ग्रॅम दिल्यानंतर आजार बरा होण्यास मदत होते. फणस मलरोधक आणि शक्तीवर्धक आहे. रक्ताभिसरणासाठी आंब्याचा आणि फणसाच्या सालीचा रस काढून त्यात चुन्याची निवळी घालून रूग्णाला दिल्यात ताकद वाढते. या गुणधर्मांमुळेच आयुर्वेदात फणसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
फणसाचं लाकूड इमारत बांधकामासाठी उपयुक्त ठरतं. फणसापासून फणसवडी, साठं, फणसपोळी, सांदण असे लोकप्रिय खाद्यपदार्थही केले जातात. गोड गऱ्यांसोबत, औषधी गुणधर्म यामुळेच बहुगुणी फणसाची मागणी दिवसेंदिवस वाढू लागलीय.
.