www.24taas.com, नागपूर
वाहन चालवण्याचा परवाना नसताना अनेक विद्यार्थी वाहनं चालवतात. त्यामुळं अपघात घडण्याची भीती असते. अशा विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी अफलातून कल्पना लढवलीय.
शाळेच्या ड्रेसमध्ये वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांकडे वाहनाचा परवाना असण्याची शक्यता कमीच आहे. परवाना नसताना वाहन चालवणाऱ्यांना वचक बसावा, म्हणून पोलिसांनी कारवाईचा नवाच फंडा शोधलाय. आता या विद्यार्थ्यांवर तर कारवाई होणारच पण त्यांच्या पालकांबरोबरच संबंधित विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार आहे, असं पोलीस आयुक्त अंकुश धनविजय यांनी स्पष्ट केलंय.
पोलिसांच्या या अजब निर्णयानं मुख्याध्यापक धास्तावलेत. मुख्याध्यापकाला शाळेत इतकं काम असतं की अशा विद्यार्थ्यांवर लक्ष कसं ठेवणार, असा त्यांचा सवाल आहे. मुळात परवाना नसताना विद्यार्थ्यांना वाहन चालवायला देणं धोक्याचं आहे, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. शाळांनी त्याबाबत जागृती करावी मात्र, यात थेट मुख्याध्यापकांना जबाबदार धरणं चुकीचं आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे.