पदाचा गैरवापर करून वाळू उपसा घोटाळा

नागपुरात पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा प्रकरणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आलंय. या प्रकरणात खनिकर्म विभागाच्या दोन कर्मचा-यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Updated: Aug 8, 2012, 08:19 AM IST

अखिलेश हळवे, www.24taas.com, नागपूर

 

नागपुरात पदाचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा प्रकरणात घोटाळा झाल्याचे उघडकीस आलंय. या प्रकरणात खनिकर्म विभागाच्या दोन कर्मचा-यांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा गोरखधंदा सुरू असल्यामुळे राज्य सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडाला आहे.

 

रेती उपसण्याच्या कंत्राटात राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात चुना लावण्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आलाय. रेती उपसण्यासाठी रॉयल्टी पुस्तिका घेणं आवश्यक असतं. मात्र नागपूरच्या खनीकर्म विभागातल्या तीन कर्मचा-यांनी सरकारचा महसूल बुडविण्याचा एक वेगळाच उपाय शोधला होता. 40 रुपये किंमतीची रॉयल्टी पुस्तिका ते कर्मचारी 320 रुपयांना विकायचे. तसंच उरलेल्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात काळाबाजारात विक्रीही करत. मुख्य म्हणजे खनिकर्म विभागाचे कर्मचारी यात सहभागी असल्यामुळे या प्रकरणात विभागाच्या वरिष्ठांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केल्यानंतर हा बोगस कारभार उघडकीस आला. जिल्हाधिकारी कार्यालयानं याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश दिलेत.या प्रकरणात वाळू माफियांची काय भूमिका आहे याबाबतही पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणी येत्या काही दिवसांत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जातेय.