Maharashtra Assembly Election Sanjay Raut: "अमित शहा व नरेंद्र मोदी हेच भाजपचे ’स्टार प्रचारक’ व तेच भाजपला महाराष्ट्रात बुडवताना दिसत आहेत," असा टोला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. "महाराष्ट्राच्या निवडणुकांत त्यांनी कश्मीरचे 370 कलम आणले. 370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्या लोकांच्या बाजूस उद्धव ठाकरे बसले आहेत, असे शहा म्हणतात. कश्मीरातून 370 कलम हटवून गृहमंत्री शहा यांनी काय प्रकाश पाडला? हा माझा त्यांना प्रश्न आहे," असंही राऊतांनी म्हटलं आहे.
"शहा सलग आठ दिवस महाराष्ट्रात प्रचार करीत आहेत. या काळात जम्मू-कश्मीरमध्ये 13 हल्ले अतिरेक्यांनी केले. त्यात 9 जवान ठार झाले व नागरिकही मेले. पुलवामात मरण पावलेले 40 जवानांचे ’आत्मे’ कश्मीरात आजही ’अस्वस्थ’ आहेत. ‘उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर आहेत. त्यांनी काँग्रेसला वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चार चांगले शब्द बोलायला सांगावे,’ असेही शहा म्हणाले. शहा हे सर्व प्रचारात का बोलतात? महागाई, आरोग्य, शिक्षण, महिला सुरक्षा यावर अमित शहांनी मते मांडली नाहीत," असं राऊत 'सामना'मधील 'रोखठोक' या विशेष सदरात म्हणाले.
"महाराष्ट्रातले उद्योग व रोजगार गुजरातेत पळवून मराठी तरुणांचे नुकसान केले ते काही काँग्रेस किंवा गांधी-नेहरूंनी नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत भलताच पुळका अमित शहा यांना आला, पण मराठी माणसांचे संघटन शिवसेनाप्रमुखांनी उभे केले. ते याच शहांनी, पैसा, पोलीस व ईडीच्या दहशतीने तोडले. तेच शहा आज काँग्रेसवाल्यांनी बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलावे असा शहाजोगपणा करतात. हे नाटक या निवडणूक प्रचारात महाराष्ट्राने पाहिले. वीर सावरकर हा विधानसभा प्रचाराचा विषय नाही, पण शहांनी तो प्रचारात आणला. सावरकरांना ’भारतरत्न’ द्या, ही शिवसेनेचीच मागणी आहे, याचा त्यांना विसर पडला," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> '...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
"ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक व दाऊद संबंधाचे एक प्रकरण फडणवीस, शिंदे वगैरे लोकांनी उकरून काढले. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या, नाहीतर हे सरकार दाऊद समर्पित आहे असे मानू, ही गर्जना फडणवीस करीत राहिले. नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे नव्हते म्हणून सरकार पाडले व सुरतला पळालो, असे तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले. आज तेच दाऊद समर्पित मलिक महायुतीमध्ये आहेत व विधानसभेचे उमेदवारदेखील झाले. फडणवीस, शिंदे यांचे ढोंग त्यामुळे साफ उघडे पडले," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचे व भ्रष्टाचाऱ्यांचे राज्य अडीच वर्षांपासून सुरू आहे. शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली. राज्याच्या प्रतिष्ठेचे अध:पतन मागील अडीच-तीन वर्षे आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवले. हा कलंक महाराष्ट्राला लागला तो 20 तारखेच्या निवडणुकीत पुसावाच लागेल. आर्थिक डबघाईला आलेला महाराष्ट्र हे चित्र बदलावे लागेल व फसवाफसवीचे राजकारण हे यापुढे चालणार नाही, असा निर्धार जनतेला करावाच लागेल," असं राऊत यांनी म्हटलं आहे.