Leader Survived Murder Attempt Caught On CCTV Video: मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी त्यांच्या आमदार मुलाच्या कार्यालयासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच तिकडे कोलकात्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकावर अशाच प्रकारच्या हल्ल्याचा प्रयत्न झाला. मात्र हल्लेखोराची बंदूक अडकली आणि गोळीच सुटली नाही. हा सारा प्रकार कसबा परिसरामध्ये घडला. तृणमूलचा हा नेता वाचला असला तरी त्याच्या हत्येच्या प्रयत्नाचा हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता महानगरपालिकेमधील वॉर्ड क्रमांक 108 चे नगरसेवक सुशांत घोष हे त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळेस दोन हल्लेखोर स्कूटरवरुन त्या ठिकाणी आले. त्यांच्यापैकी एकाने बंदूक बाहेर काढून घोष यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन वेळा बंदुकीचा ट्रीगर दाबला. मात्र बंदुकीतून गोळी सुटलीच नाही.
आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न होतोय हे समजल्यानंतर घोष हल्लोखोरावर धावून गेले. हल्लेखोराने त्याच्या सहकाऱ्याच्या स्कूटरवरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला स्कूटरवर बसताच आलं नाही. तो सहकाऱ्याच्या स्कूटरच्या पाठी पळत असतानाच या नगरसेवकाने धावत त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. या हल्लेखोराला बेदम मारहाण करण्यात आली. या हल्लेखोराला नंतर जाब विचारण्यात आला. तुला या हल्ल्याची सुपारी कोणी दिली होती हे ऑन कॅमेरा रेकॉर्ड करुन घेण्यात आलं.
"मला पैसे देण्यात आले नव्हते. केवळ मला फोटो देण्यात आलेला आणि याची हत्या करायीच असं सांगितलेलं," असं हा हल्लेखोर गुन्ह्याची कबुली देण्यासंदर्भात शूट केलेल्या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. जमावाने नंतर या हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या हल्लेखोराला बिहारमधून नगरसेवक घोष यांच्या हल्ल्याची सुपारी देण्यात आलेली. स्थानिक स्तरावरील वैर या हल्ल्यामागील कारण असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या फसलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं सीटीटीव्ही फुटेज तुम्हीच पाहा...
WATCH | Dramatic scenes unfold in Kolkata after assailant aims gun at Trinamool Congress councillor Sushanta Ghosh but fails to shoot.
The entire episode was caught on cam #SushantGhosh #Kolkata #TMC #BreakingNews #viralvideo pic.twitter.com/PB3vCO6I0a
— The Theorist (@thetheorist_in) November 16, 2024
आपल्या हत्येचा कट कोणी रचला असावा याची काहीच कल्पना नाही असं नगरसेवक घोष यांनी म्हटलं आहे. "मागील 12 वर्षापासून मी नगरसेवक आहे. मी असा कधीच विचार केला नव्हता की माझ्यावर हल्ला होईल. विशेष म्हणजे माझ्यात परिसरात येऊन मी घराबाहेर बसलेलो असताना हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा धक्का अधिक बसला आहे," असं घोष म्हणाले, स्थानिक खासदार माला रॉय आणि आमदार जावेद खान यांनी घोष यांची भेट घेतली आहे.