आता राज घेणार परीक्षार्थींची मुलाखत

मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत.

Updated: Dec 20, 2011, 05:00 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

मनसेकडून नाशिक महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची बेचैनी वाढू लागलीये. २६ डिसेंबरपासून स्वतः राज ठाकरे इच्छुकांची मुलाखत घेणार आहेत. मनसेचे हेडमास्तर राज यांच्यासमोर जाण्य़ासाठी इच्छुकांनी तयारी सुरु केलीये. राज सरांसमोर आपलं काय होणार या कल्पनेनं नवख्या आणि प्रस्थापितांच्या ह्रदयाची धडधड वाढलीये.

 

नाशिक महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तब्बल साडेसातशे इच्छुकांनी लेखी परीक्षा दिलीये. राज ठाकरे इच्छुकांनी लिहलेला पेपर हातात घेऊन मुलाखत घेणार आहेत. राज सरांसमोर ज्ञानाचं जाहीर प्रदर्शन होणार असल्यानं मनसेचे अनेक प्रस्थापित धास्तावलेत.

 

मनसेच्या लेखी परीक्षेच्या क्लायमॅक्सला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेत इच्छुकांचा निकाल लागणार आहे. मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीच्या परीक्षेत मतदार राज ठाकरेंना पास करतील का याचीच अधिक उत्सुकता लागलीये.