www.24taas.com, नाशिक
महाराष्ट्र दिनाचा सगळीकडे जयजयकार होत असताना नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं. पण कांद्याचं आंदोलन येत्या काळात आणखी तीव्र होईल, याचे संकेत या आंदोलनानं दिले.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. कांद्याला हमीभाव देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही, त्यामुळे शेतकरी संघटनेनं पुन्हा आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. काहींनी अंगावर रॉकेल ओतून घेतलं तर काही रॉकेल ओतण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी बळाचा वापर करून २४ आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि आंदोलन चिरडून टाकले.
पुन्हा आंदोलन करणार नाही, रस्त्यावर उतरणार नाही अशी लेखी हमी घेतल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आलं. पोलिसांनी बाळाचा वापर करून तर याधी सरकारनं आश्वासनावर बोळवण करून आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांना जितकं दडपण्याचा प्रयत्न केला जातोय तितकाच उद्रेक वाढत चाललाय. त्यामुळे आंदोलनाला कुठलंही गालबोट लागण्याआधी राज्यसरकारनं त्यांच्या मागण्याचा विचार करून कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याची गरज आहे.