मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरातून ‘जकात हटवा’ मोहीम जोरदार सुरू झाली आहे. जकात खाजगीकरणाला व्यापारी आणि उद्योजकांनी कडाडून विरोध केला आहे. जकातीच्या खाजगी ठेकेदारांना नाशिककर पुरते वैतागले आहेत.
नाशकात खाजगी ठेकेदारांना जकातीचा ठेका दिल्याबद्दल नाशिककरांमध्ये प्रचंड रोष आहे. खाजगी जकात ठेकेदारांकडून आर्थिक लूट केली जाते, तसंच चार चार दिवस माल अडवून ठेवला जातो, खाजगी ठेकेदार मनमानी आणि दमदाटी करतात, असे आरोप होत आहे. जकातीला पर्याय म्हणून LBT अर्थात स्थानिक संस्था कर लागू करण्याची मागणी करण्यात आली.
निवडणुकीआधी जकात खाजगीकरणाला विरोध करणाऱ्या मनसेनं आता मात्र राज्य सरकारच्या कोर्टात चेंड़ू टाकला आहे. जकातीला पर्याय शोधताना महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच सर्वमान्य पर्याय शोधण्याची कसरत सत्ताधाऱ्यांना करावी लागणार आहे. त्यातही मनसेची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊन काय भूमिका घेणार आणि त्यातून सत्ताधारी कसे मार्ग काढणार, याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय.
[jwplayer mediaid="74396"]