मुकूल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाथ संप्रदायाचे संस्थापक निवृत्ती नाथांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. माऊलीच्या ओढीनं प्रस्थान करणारी ही पहिलीच पालखी असते.यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक त्र्यंबकनगरीत दाखल झाले असून प्रशासनानंही मोठी तयारी केली आहे.
वर्षभराचा कालखंड लोटल्यानंतर पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कडेकपारीत विठू नामाचा गजर घुमू लागलाय. आषाढी एकादशीच्या पंढरपूरमधील भक्तीरसात नाहून निघण्यासाठी निवृत्तीनाथांच्या पालखीसह हजारो पावलं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याच्या तयारीत आहे. वारी म्हटली की, देहू, आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जाणा-या पालखी सोहळ्यांचीच चर्चा होते. मात्र ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि गुरू यांच्या पालखी सोहळ्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळेच झी 24 तासनं वारीच्या उगमस्थानाकडे दर्शकांचं लक्ष वेधलंय.
आषाढीवारीसाठी निवृत्ती नाथांची पालखी सर्वप्रथम पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होते. या पालखी सोहळ्यासाठी औरंगाबाद, परभणी, पंढरपूर, आळंदी आदी ठिकाणांहून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. निवृत्ती नाथांची पालखी आज विठूनामाचा जयघोष आणि नाथांचा जयजयकार करत प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टसह प्रशासनही सज्ज झालंय. २६ दिवस चारशे किलोमीटरचा प्रवास करुन विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीनं वारकरी २९ जूनला पंढरपुरात दाखल होतील.