www.24taas.com,धुळे
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची चक्क पोलिसांनीच एका आलिशान हॉटेलमध्ये सरबराई केल्याची घटना उघडकीस आली.
गेल्या आठवड्यात मुंबईच्या भरारी पथकाने शिरपूर तालुक्यातल्या आंबाडुकपाडा इथं ५५ लाखांची बनावट दारू जप्त केली होती. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली होती. या सर्व जणांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा एक दिवसाची कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, पोलिसांनी या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्याऐवजी या आरोपींना एका शानदार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर शिरपूर आणि नरडाणा पोलीस ठाण्यात जागा नसल्याने आरोपींना हॉटेलमध्ये थांबवण्यात आल्याचं सांगत पोलिसांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. शिरपूर आणि नरडाणा पोलीस ठाण्यात आरोपींना ठेवण्यास जागाच शिल्लक नसल्यानं त्यांना हॉटेलमध्ये न्यावं लागलं, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.