ले.क.पुरोहितांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहीत यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. पण सहआरोपी अजय राहिकर यांना काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Updated: Nov 9, 2011, 04:21 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्ब स्फोट खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहीत यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. पण सहआरोपी अजय राहिकर यांना काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 

लेफ्टनंट कर्नल पुरोहित हे केवळ हिंदु राष्ट्र स्थापनेबद्दलच बोलत नव्हते तर त्यांनी आरडीएक्स स्फोटकं उपलब्ध करुन देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचं कारण देत न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. आपल्याकडे आरडीएक्स असल्याचं साक्षीदाराला सांगितल्याची खातरजमा खटल्याच्या सूनावणी दरम्यान करणं आवश्यक असल्याने त्यांना जामीन देणं शक्य नसल्याच निरीक्षण न्यायाधीश आर.सी.चव्हाण यांनी नोंदवलं. अजय राहिरकरच्या संदर्भात संभाषणातून त्याच्या सहभाग उघड होत नाही. तसंच त्याने शस्त्राअस्त्र विकत घेण्यासाठी पैसे पुरवले एव्हढ्यापुरताच त्याचा सहभाग मर्यादीत असल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचं न्यायाधिशांनी म्हटलं आहे.

स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांच्या खरेदीत किंवा ते उपलब्ध करुन देण्यात राहिकरचा कोणताही सहभाग नसल्याचं निरीक्षण न्यायाधिशांनी नोंदवलं आहे. राहिरकरला एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. तसंच राहिरकरला साक्षीदारांपासून दूर राहण्यास आणि खटल्याची सूनावणी पूर्ण होई पर्यंत महिन्यातून एकदा नॅशनल इन्वेस्टिगेटिंग एजन्सीच्या कार्यालयात किंवा एनआयएच्या अधिकाऱ्यसमोर हजेरी लावण्याची अट घालण्यात आली आहे.  मालेगावचा रहिवाशी निस्सार अहमद हाजी सय्यद बिलालने या दोघांच्या जामीनाला विरोध केला.