लष्कराची गोळी गरीबांच्या दारी

लष्कराच्या हद्दीतून सुसाट सुटलेल्या गोळीनं नाशिकच्या पांडवनगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची झोप उडवली आहे. लष्करी हद्दीत नियमित सुरु असणाऱ्या गोळीबार सरावातली एक गोळी थेट एका घरामध्ये थडकली. यात कुठलीही हानी झाली नाही पण चार दिवसांत अशी दुसरी घटना घडल्यानं इथले लोक जीव मुठीत धरुन जगत आहे.

Updated: Nov 9, 2011, 03:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

लष्कराच्या हद्दीतून सुसाट सुटलेल्या गोळीनं नाशिकच्या पांडवनगरी परिसरात राहणाऱ्या नागरिकांची झोप उडवली आहे. लष्करी हद्दीत नियमित सुरु असणाऱ्या गोळीबार सरावातली एक गोळी थेट एका घरामध्ये थडकली. यात कुठलीही हानी झाली नाही पण चार दिवसांत अशी दुसरी घटना घडल्यानं इथले लोक जीव मुठीत धरुन जगत आहे.

पांडवनगरीतल्या वल्लभ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अंजली साळवे यांचे दैव बलवत्तर म्हणून साळवे कुटुंबीय आज सुरक्षित आहेत. मंगळवारी लष्कराच्या हद्दीत सुरु असलेल्या सरावावेळी एक गोळी थेट साळवे यांच्या दरवाजात घुसली. नेहमी दरवाजा उघडाच असणाऱ्या साळवेंच्या घऱाचा दरवाजा मंगळवारी सुदैवानं बंद होता, त्यामुळे मोठं संकट टळलं. चार दिवसांपूर्वीही अशीच एक गोळी या परिसरात आली होती. रहिवासी परिसर असल्यानं या ठिकाणी नागरिकांची कायम वर्दळ असते. लहान मुलंही या परिसरात नेहमी खेळत असतात. त्यामुळे सध्या या परिसरातले नागरिक दहशतीत वावरत आहे.

या परिसरापासून दोन किलोमीटरवर गांधीनगर लष्करी हद्दीत लष्कराचा सराव सुरु असतो. या परिसरातून इतक्या लांब गोळ्या येतात कशा, याचा तपास आता पोलीस करत आहेत. तसंच या निमित्तानं लष्करी हद्दीजवळ असलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. याआधी गांधीनगर विमानतळासाठी नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. पण विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव फेटाळला गेला. त्यानंतर देवळाली कॅम्प परिसरात दोन फेब्रुवारीला एक हेलिकॉप्टर पडलं होतं. आता लष्कराच्या गोळ्या थेट घरात येऊन थडकता. बिल्डर लॉबीपुढे झुकून नगररचना विभाग लष्करी हद्दीजवळ इमारतींनी परवानगी देतं आणि हेच नागरिकांच्या जीवावर बेततं की काय?