कोयनेच्या पाण्याखाली घडवणार स्फोट...

कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत.

Updated: Apr 20, 2012, 07:09 AM IST

www.24taas.com, सातारा

 

कोयनेच पाणी पुन्हा एकदा उसळी घेणार आहे. होय, चवथ्या टप्प्यातील लेक ट्यापिंगची तयारी पूर्ण झाली. येत्या २५ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून कोयनेच्या पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे कोयना क्षेत्रातील दुष्काळी भागातील पाण्याची गरज भागवता येणार आहे. वीजनिर्मिती प्रभावित होऊ न देता कोयनेच्या पाण्याचा थरार २५ एप्रिलला पुन्हा अनुभवता येणार आहे.

 

कोयना जलाशयातलं पाणी बोगद्यात सोडण्यासाठी पाण्याखाली स्फोट घडवण्यात येणार आहे. हा प्रयोग जितका आकर्षक, तितकाच थरारकही. त्यासाठी सुमारे साडेचार किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला आहे. जलविद्युत निर्मिती प्रकल्पाच्या जुन्या बोगद्याला  नवीन  बोगदा जोडण्यात आला आहे. कोयनेतील पाणी आणि बोगदा यामध्ये आता केवळ  ५ मीटरचा खडक आहे. दीड टन स्फोटकांच्या सहाय्यानं दोन ठिकाणी स्फोट घडवून हा खडक फोडला जाईल तेव्हा कोयनेतील पाण्याच्या लाटा उसळतील. अर्थात हे सगळं करत असताना कोयनेच्या सुरक्षेबाबत कमालीची सतर्कता बाळगण्यात येणार आहे.

 

यापूर्वी १३ मार्च २००९ रोजी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती यानिमित्तानं होणार आहे. दोन वर्षांचे परिश्रम आणि दहा कोटी रुपये खर्चून हे लेक टॅपिंग करण्यात येणार आहे.. नॉर्वेच्या तंत्रज्ञानाची मदतही त्यासाठी घेण्यात आली आहे. या टँपिंगमुळे सिंचनासाठी २० टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. कोयना धरणाचा सध्याचा उपलब्ध पाणीसाठा १०५.२५ टीएमसी आहे. त्यापैकी २३ टीएमसी पाणी सिंचन तसेच इतर नागरी गरजांसाठी वापरले जाते. ६७.५ टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती चालते, यातून कोयानातून १९६० मेगावॉट विजेची निर्मिती होते. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी खाली जाते.

 

अशा परिस्थितीत दुष्काळी भागाला पाणी पुरवायचं झाल्यास वीज निर्मिती खंडित होते. वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी लेक ट्यापिंगचा पर्याय शोधण्यात आला आहे.महत्वाचं म्हणजे या प्रयोगामुळे कोयानातील वीजनिर्मिती अबाधित राहणार आहे.