www.24taas.com, पुणे
पुण्यातल्या पीएमपीच्या तीन बसेस आरटीओनं जप्त केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेला मोटार वाहन कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. दोन सरकारी संस्थांमधील अनोख्या कारभाराचा नमुना यानिमित्तानं पुढे आलाय.
पीएमपीच्या काही बसेस पुण्याच्या रस्त्यांवर किंवा पीएमपीच्या डेपोमध्ये न दिसता आरटीओच्या ग्राऊंडवर दिसत आहेत. आरटीओनं या बसेस जप्त केल्या आहेत. कारण पीएमपीनं जवळपास ३६ लाख ३४ हजार रुपयांचा मोटार वाहन कर थकवलाय. तसंच महिला व बालसंगोपन सेसही गेल्या १२ वर्षांचा थकलेला आहे. त्याचा आकडा १३६ कोटी रुपयांवर गेलाय. वेळोवेळी पाठपुरावा करुनही पीएमपीनं थकबाकी भरलेली नाही.
ही थकबाकी भरण्याची पीएमपीची आर्थिक क्षमता नाही. अशा स्थितीत राज्य सरकारनं हा थकीत कर माफ करावा अशी मागणी पीएमपीनं केलीय. अशा आजारी अवस्थेतली पीएमपी पुणेकरांना चांगली सेवा कशी देणार असा प्रश्न यानिमित्तान उपस्थित होतोय.