मावळ गोळीबार... आदेश नसतानाही गोळीबार?

मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांची चौकशी आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी झाली. या साक्षीमध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.

Updated: May 15, 2012, 07:42 PM IST

www.24taas.com, पुणे

 

मावळ गोळीबार प्रकरणी संदीप कर्णिक यांची चौकशी आयोगासमोर साक्ष आणि उलटतपासणी झाली. या साक्षीमध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. आंदोलन पूर्वनियोजित असतानाही पोलिसांचा या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजिबात गंभीर नव्हता, असं यामधून पुढे आलं आहे. आंदोलन होणार हे माहीत असतानाही, वाहतुकीसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती.

 

त्याचबरोबर आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांनी जी जाळपोळ केली, त्याचा उल्लेख सरकारला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये नाही. पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वी शेतकऱ्यांना गोळीबार किंवा लाठीचार्जचा इशारा दिला होता का, याचाही उल्लेख सरकारला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये नाही. या महत्त्वाच्या गोष्टी संदीप कर्णिक यांच्या साक्षीदरम्यान पुढे आल्या आहेत.

 

मावळ गोळीबार प्रकरणी राज्य सरकारनं चौकशी आयोग स्थापन केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मावळ तालुक्यात बोऊरमध्ये ९ ऑगस्ट २०११ रोजी गोळीबार झाला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन शेतकरी ठार झाले होते. त्यावेळी संदीप कर्णिक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक होते.