www.24taas.com, पुणे
सेवाभावी ट्रस्ट म्हणून चालवली जाणारी हॉस्पिटल्स प्रत्यक्षात कसा जाच करतात, त्याचं उदाहरण नुकतंच पुण्यात पहायला मिळालं. रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना सवलत देणं बंधनकारक आहे. पण हॉस्पिटलच्या मुजोरीमुळं एका रुग्णाचा जीव गेलाय.
प्रमोद ढवण यांना हृदयाचा आजार असल्यानं काही दिवसांपूर्वी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्रमोद यांच्या ऑपरेशनसाठी साडे चार लाखांचा खर्च येणार होता. प्रमोद यांच्या नातेवाईकांनी उत्पन्नाची आणि इतर कागदपत्रं हॉस्पिटलला सादर केली आणि सवलतीच्या दरात उपचार करण्याची मागणी केली. हॉस्पिटलनं सवलत द्यायला नकार तर दिलाच. त्याचबरोबर उपचारही सुरु केले नाहीत. आणि त्यातच प्रमोद ढवण यांचा मृत्यू झाला.
हॉस्पिटलच्या अधिका-यांनी प्रमोद यांच्या मृत्यूनंतर घूमजाव केलंय. ढवण यांचा मृत्यू होईपर्यंत जे उपचार झाले, त्या खर्चात सवलत देण्याची तयारी आता हॉस्पिटलनं दाखवलीय. परंतु मृत्यूच्या आधीच उपचारांमध्ये सवलत का दिली नाही, याचं उत्तर त्यांच्याकडे नाही.
रुबी हॉल क्लिनिकसाठी पुणे महापालिकेनं तब्बल सत्तावीस हजार स्क्वेअर फुट जागा सवलतीच्या दरात दिलीय. तसंच तीन एफ.एस.आय.पर्यंत बांधकामाचीही मुभा देण्यात आली. त्याबदल्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी रोज २८ बेड्स राखीव ठेवण्याचा आणि अल्प उत्पन्न गटातल्या रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार करण्याचा करार महापालिका आणि हॉस्पिटल प्रशासनात झाला होता. हॉस्पिटल्सकडून मात्र या कराराचं पालन कसं होतंय, हे सांगण्यासाठी ढवण यांचं उदाहरण पुरेसं आहे.
सेवाभावी ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत असल्यानं अशा हॉस्पिटलना महापालिकेच्या सुविधांबरोबरच राज्य सरकारकडूनही अनेक सवलती मिळतात. मात्र अशी हॉस्पिटल्स मुजोरी करत रुग्णांपर्यंत सुविधा पोहोचवतच नाहीत. आता रुबी हॉस्पिटलच्या अंगाशी आल्यानंतर त्यांनी खर्च देण्याची तयारी दाखवली....पण त्यामुळे रुग्णाचा गेलेला जीव नक्कीच परत येणार नाही.