झी २४ तास वेब टीम
राज्यातील १२८ नगरपालिकांची मतमोजणी आज सुरू झाली आहे. त्यामुळे या नगरपालिकेमध्ये अनेक दिग्गजांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार हे निश्चित. त्याचप्रमाणे गेली अनेक दिवस रंगणाऱ्या राणे-जाधव वादामुळे सिंधुदुर्गमधील नगरपालिका निवडणूका ह्या अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. त्यामुळे आता राज्यभरात निवडणूकांच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यातल्या १२८ नगरपालिकांसाठीची मतमोजणी आज होणार आहे. काल एकूण १६८ नगरपालिकांसाठी मतदान झालं होतं. सुमारे ६५ टक्के मतदारांनी यात मतदान केलं. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होऊन कुणाच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे हे कळेल. सातारा जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान झालं. तर बुलढाणा जिल्ह्यात ९ नगरपालिकांसाठी ६५ टक्के मतदान झालं.
रायगडमध्ये ७० टक्के तर रत्नागिरीत ५५ टक्के मतदान झालं. सांगली जिल्ह्यातल्या तीन नगरपालिकांसाठी ७४ टक्के मतदान झालं. सांगलीत १४ तारखेला मतमोजणी होईल. जळगाव जिल्ह्यातल्या १२ नगरपालिकांसाठी ६५ टक्के मतदान झालं. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झालं. मराठवाड्यातही सरासरी ६५ टक्के मतदान झालं. मराठवाड्यातल्या सुमारे तीन हजार उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज लागणार आहे.