मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर प्रशासनानं तातडीनं कामाला लागलंय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ठिकठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटर्सवर धाड टाकली गेलीय. आज टाकलेल्या धाडींत धुळ्यात एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आलीय, तर जळगाव आणि नाशिकमध्ये अनेक सोनोग्रापी सेंटर्सना सील ठोकण्यात आलंय.
धुळ्यात महिला डॉक्टरला अटक
राज्यात स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक खळबळजनक घटना उजेडात आल्यानंतर आता धुळे शहरातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुमारे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका गर्भपातप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी डॉक्टर पायल सिंघवी यांना अटक केलीय. तसंच याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
एका निनावी पत्राद्वारे शासनाच्या हेल्प लाईनवर तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान ९ जानेवारी २०१२ रोजी गर्भपात करण्यात आल्याचं उघड झाल्यावर याप्रकरणी जिल्हा आरोग्यअधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून सिंघवी हॉस्पिटलच्या डॉ. पायल सिंघवी यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. गर्भपात करण्यात आलेलं अर्भक हे स्त्री जातीचं असल्याचा दावा धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी आरोग्य अधिकाऱ्यांनी केलाय. डॉ. सिंघवी यांच्या गर्भपात केंद्राचा परवानाही रद्द करण्यात आलाय. दरम्यान, याप्रकरणी शहरातील एका सोनोग्राफी सेंटरमधील सोनोग्राफी मशीनदेखील सील करण्यात आलं आहे.
जळगावात सोनोग्राफी सेटर्सवर छापे
राज्यातल्या सगळ्या सोनोग्राफी सेंटर्सच्या तपासणीच्या मोहिमेअंतर्गत आज पुन्हा जळगावमध्ये सोनोग्राफी सेंटर्सवर छापे टाकण्यात आले. त्यात जिल्ह्यातील १८ सोनोग्राफी सेंटर्सना सिल ठोकण्यात आलंय. कालदेखील जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ७० सोनोग्राफी सेंटर्सवर धाडी टाकण्यात आल्या. त्यातल्या ११ सोनोग्राफी सेंटर्समध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना सील ठोकण्यात आलं आहे. तसंच ४५ गर्भपात सेंटर्सची तपासणी करण्यात आली असून त्यातल्या ५ सेंटर्सच्या रेकॉर्डमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मान्यता काढून घेण्यात येणार आहे. भुसावळ, अंमळनेर आणि जळगावमधली ही सगळी सेंटर्स आहेत.
नाशिकमध्येही सोनोग्राफी मशिन्स सील
राज्यभरात सुरु असलेल्या सोनोग्राफी सेंटर्सवरील मोहिमेत नाशिकमधील शासकीय उपकेंद्रातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलंय. शासकीय उपकेंद्रात सोनोग्राफी केंद्र चालवण्यास अधिकृत रेडिओलॉजिस्ट नसल्यामुळे हे केंद्र सील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. या केंद्राचा गैरवापर होण्याच्या शक्यतेनं ही कारवाई करण्यात आलीय. तसंच तपासणी करण्यात आलेल्या ५५ सोनोग्राफी सेंटर्सपैकी ग्रामीण भागात ५ तर मालेगावात ५ अशी १० सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आली आहेत.
.