www.24taas.com, सोलापूर
‘राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही’ या ढोबळेंच्या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध होतोय. पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढोबळेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.
पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटेच्यावतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टींनी ढोबळे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर ‘ढोबळे यांच्या वक्तव्यानं सरकार दुष्काळाबाबत किती गंभीर आहे हे लक्षात येतं’, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ढोबळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय.
एवढंच नाही तर, दुष्काळाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून पाणीपुरवठा लक्ष्मण ढोबळे आपल्या वक्तव्यामुळे चांगलेच गोत्यात आलेत. त्यांच्याच पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनीही त्यांना घरचा आहेर दिलाय. ‘पाणीटंचाई आहे म्हणूनच केंद्राकडे पॅकेज मागितलं’ असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या ढोबळेंच्या मुक्ताफळांना उत्तर दिलंय. राज्यात पाणी आणि चाराटंचाई असल्याचंही भुजबळांनी मान्य केलंय.
संबंधित बातमी
दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं…