www.24taas.com, -ल्यॉन
इंटरपोलने युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील डझनभर शहरांमध्ये केलेल्या कारवाईत २५ हॅकर्सना अटक केली आहे. हे सर्वजण एनॉनिमस हॅकर्स ग्रुपचे सदस्य असल्याचा संशय आहे. स्पेन, कोलंबिया, चिले आणि अर्जेनटिना या देशातून सायबर हल्ल्यांच्या मालिकेनंतर फेब्रुवारीच्या महिन्यात ऑपरेशन अनमास्क हाती घेण्यात आलं असं इंटरपोलने म्हटलं आहे.
कोलंबियाच्या संरक्षण खात्याच्या तसंच राष्ट्राध्यक्षांच्या आणि चिलेच्या एन्डेसा इलेक्ट्रिकसिटी कंपनी आणि नॅशनल लायब्ररीच्या वेबसाईटर हल्ले चढवण्यात आले होते. अर्जेनटिना, चिले, कोलंबिया आणि स्पेनच्या पोलिसांनी ऑपरेशन अनमास्क हाती घेतलं. या कारवाई अंतर्गत १५ शहरातील ४० ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर कम्प्युटर सामग्री आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले.
पोलिसांनी संशयितांकडून क्रेडिट कार्ड आणि रोकडही मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतली. कारवाईत अटक करण्यात आलेले संशयित १७ ते ४० वयोगटातील आहेत. पण अटक करण्यात आलेले एनॉनिमस या आंतरराष्ट्रीय हॅकर्सचे ग्रुपचे सदस्य असल्याचा पुरावा असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या सर्वांनी कंपन्यांच्या आणि सरकारच्या वेबसाईटवर हल्ला चढवत गोपनीय माहिती इंटरनेट पोस्ट केली.
अर्जेनटिनातून दहा जणांना तर चिलेतून सहा आणि कोलंबियातून पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं. कम्प्युटर लॉगमधून आयपीचा शोध घेतल्यानंतर या सर्वांचा ठावठिकाणी लागला.