www.24taas.com, मुंबई
राज्यात महापालिका निवडणुकांनंतर आता रक्तरंजीत राजकीय राड्याला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि नागपुरात राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्या आहेत तर पुणे आणि नाशकातही तोडफोड करण्यात आली आहे.
काय आहेत घटनाक्रम
नागपूर महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजित राडा सुरू झालाय. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडलीये. केशव आकरे यांनी भाजपचा प्रचार केला आणि त्यामुळेच आपण हरलो हा राग मनात धरून संजय बारई यांनी आकरे यांचा निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपी संजय बारईला साथीदारांसह अटक केलीय. या रक्तरंजित घटनेनं नागपूर शहर हादरून गेलं आहे.
मुंबईतल्या धारावीतही भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आलीये. भाजपच्या धारावी सायन विभागाचे खजिनदार असलेल्या वसंतलाल जोटा यांची हत्या करण्यात आलीये. व्यवसायानं ते रेशनिंग दुकानदार होते. . ही हत्या निवडणुकांच्या वादातूनच झाल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. जोटा यांच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय.
पुणे येथील पाषाण सुतारवाडी परिसरात निवडणुकीच्या वादातून गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहिणी चिमटे यांचा विजय झाल्यानं नैराश्यातून राष्ट्रवादीच्याच दुस-या गटाकडून चिमटेंच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आलीय. यात ३० ते ४० गाड्यांचं नुकसान झालं असून त्याचा सामान्य नागरिकांनाही फटका बसलाय. राष्ट्रवादीनं तिकीट नाकारलेल्या आबा सुतार यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप रोहिणी चिमटे यांनी केलाय.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पराभवाचे पडसाद आता उमटू लागलेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार दिलीप दातीर यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला झाला असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवसेनेचे पराभूत उमेदवार निवृत्ती दातीर आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याच्या तक्रारीवरून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सिडको विभागातील प्रभाग क्रमांक ४९मधून शिवसेनेचे मावळते नगरसेवक दिलीप दातीर यांना उमेदवारी नाकारून पक्षानं निवृत्ती दातीर यांना उमेदवारी दिली होती.
सातारा - मुख्यमंत्र्यांच्या साता-या जिल्ह्यात ऑनर किलिंगची खळबळजनक घटना घडलीय. सातारा जिल्ह्यातल्या औंधमध्ये एका पित्यानं उच्चशिक्षित मुलीची हत्या केल्याचं समोर आलंय. समाजातल्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्याने शंकर शिंदे यांनी त्यांची मुलगी आशा हिच्या डोक्यात लोखंडी दांडा घालून हत्या केलीय.