www.24taas.com, लंडन
पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमनं विजय खेचत आणून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय.
रविवारी झालेल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये भारताच्या मेरी कॉम हिनं पोलंडच्या कॅरोलिना निखाजूक हिला मात दिलीय. १९-१४ अशा फरकानं कॅरोलिनाचा पराभव करत मेरी कॉमनं क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. यानंतर तिची लढत असणार आहे ती ट्युनिशियाची बॉक्सर मरोआ रहाली हिच्यासोबत. सोमवारी ही क्वार्टर फायनल मॅच रंगणार आहे.
२९ वर्षीय मेरी कॉम हिच्याकडून तमाम भारतीयांना पदकाची मोठी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बॉक्सर्सचा समावेश करण्यात आलाय. आणि मेरी कॉम ही देखील ५१ किलो वजनी गटात पहिल्यांदाच खेळत आहे.