www.24taas.com, पर्थ
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्राय सीरिजमधील दुसरी मॅच पर्थमध्ये रंगणार आहे. पहिल्या मॅचमध्ये कांगारूंकडून पराभव सहन कराव्या लागलेल्या टीम इंडियाकडे सीरिजमध्ये कमबॅक करण्याची नामी संधी आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत.
वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत टीम इंडियानं तब्ब्ल २८ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र, वर्ल्ड कपनंतर भारताची कामगिरी लौकीकाला साजेशी झालेली नाही. इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही टेस्ट सीरिजमध्ये भारताला व्हाईटवॉशला सामोर जाव लागलं. त्यातच ट्राय सीरिजमधील पहिल्याच मॅचमध्ये भारताला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. आता, दुस-या मॅचमध्ये टीम इंडियाचा मुकाबला श्रीलंकेशी होणार आहे. वर्ल्ड कपमध्ये लंकेला पराभूत केल्यानं भारताच पारड जड आहे.
मात्र, धोनी अँड कंपनीला सतत पराभवाला सामोर जाव लागतंय. त्यामुळे महेला जयवर्धनेच्या टीमला पराभूत करण्यासाठी भारतीय टीमला चांगलेच कष्ट करावे लागतील. ओपनिंग जोडी फ्लॉप ठरल्यावर भारताची मिडल ऑर्डरही कोसळते. ओपनिंगला सचिन तेंडुलकर अथवा गौतम गंभीरला विश्रांती देण्यात येणार असल्याच वीरेंद्र सहेवागनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे सेहवाग टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दुखापतीनं त्रस्त असलेला झहीर खानही टीममध्ये परतू शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पिनर्सनी निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आर. अश्विन, रविंद्र जाडेजा आणि राहुल शर्मा या तिघांपैकी एका स्पिनरला विश्रांती देण्यात येऊ शकतो. दुसरीकडे श्रीलंकेच्या टीमची कॅप्टन्सी महेला जयवर्धनेकडे असणार आहे. नविन कॅप्टनच्या कॅप्टन्सीखाली लंकेची टीम कशी कामगिरी करते ते पहाण महत्त्वाच ठरणार आहे. आता, भारत आपली पराभवाची मालिक खंडित करण्यात यशस्वी होते का? याकडे भारतीय क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.