१० पठाणी सिक्स, आशिया कप फिक्स?

ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झालेल्‍या युसूफ पठाणने १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने विजय हजारे कप सामन्‍यात धुवाँधार शतक ठोकून आशिया कप मालिकेसाठी संघात आपली दावेदारी केली आहे.

Updated: Feb 28, 2012, 03:42 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झालेल्‍या युसूफ पठाणने १० उत्तुंग षटकारांच्या मदतीने विजय हजारे कप सामन्‍यात धुवाँधार शतक ठोकून आशिया कप मालिकेसाठी संघात आपली दावेदारी केली आहे. युसूफने सौराष्‍ट्रविरूद्ध आपला पठाणी हिसका दाखवताना फक्‍त ७८ चेंडूत सहा चौकार आणि १० षटकारांसह ११४ धावा बनवल्‍या.

 

गुडघ्‍याच्‍या दुखापतीमुळे पठाण गेल्‍या दोन महिन्‍यांपासून संघाबाहेर आहे. बेंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अॅकडमीमध्‍ये प्रशिक्षण घेतल्‍यानंतर त्‍याने स्‍पर्धात्‍मक क्रिकेटमध्‍ये पुनरागमन केले आहे. शतकानंतर पठाणने संघात पुनरागमनाची आशा व्‍यक्‍त केली आहे. पठाणने मारलेल्‍या शतकाने योग्‍य टायमिंग साधले आहे. बुधवारी आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. त्‍यामुळे त्‍याने मारलेल्‍या शतकाला अनन्‍यसाधारण महत्त्व प्राप्‍त झाले आहे.
या खेळीने आपला आत्‍मविश्‍वास वाढल्‍याचे पठाणने माध्‍यमांशी बोलताना सांगितले. पठाणने जानेवारी २०११ मध्‍ये दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या सेन्‍च्‍युरियन येथील एकदिवसीय सामन्‍यात शानदार १०५ धावा लगावल्‍या होत्‍या. परंतु, त्‍यानंतरच्‍या सामन्‍यांमध्‍ये तो गोलंदाजी आणि फलंदाजी या दोहोंमध्‍ये अपयशी ठरला होता. पठाणने आपला शेवटचा एकदिवसीय सामना १६ जून २०११ रोजी वेस्‍ट इंडिजविरूद्ध किंग्‍सटन येथे खेळला होता. त्‍यामध्‍ये त्‍याने फक्‍त ३० धावा केल्‍या होत्‍या.

 

Tags: