ठाकरे गटाची सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ

Maharashtra Politics : आमची विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याची तयारी आहे, असं विधान खासदार संजय राऊतांनी केल्यामुळे मविआत वादाची ठिणगी पडली आहे. श्रीगोंदा मतदारसंघावर संजय राऊतांनी आधीच दावा केल्यामुळं मविआत नाराजीचा सूर उमटलाय.

वनिता कांबळे | Updated: Sep 22, 2024, 09:22 PM IST
ठाकरे गटाची सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी; संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ

MahavikasAghadi Vidhansabha Election : महाविकासआघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असतानाच खासदार संजय राऊतांच्या एका विधानानं मविआत वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा विधानसभेवर दावा करून विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्याची आमची तयारी असल्याचं मोठं विधान संजय राऊतांनी केलंय. त्यामुळं मविआत खळबळ उडाली आहे.

राऊतांच्या या विधानावरून मविआत नाराजीचा सूर उमटलाय. जागावाटपाची चर्चा सुरू असताना कुणीही उमेदवार जाहीर करू नये, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. तर शरद पवारांची भूमिका योग्य असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

या वादाची सुरुवात झाली ती राऊतांनी 3 जुलैला केलेल्या एका वक्तव्यातून. श्रींगोद्यातून साजन पाचपुते आणि पारनेरमधून राणी ताई लंके एकाच गाडीतून विधानसभेत पोहोचतील, असं वक्तव्य राऊतांनी केलं होतं. जागावाटपापूर्वीच राऊतांनी श्रीगोंद्यातून उमेदवारी घोषित केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र यावरून वाद सुरू होताच संजय राऊतांनी यू-टर्न घेतला.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही याच आशयाचं वक्तव्य करून ठाकरे पक्षाची सर्व 288 जागा लढवण्याची तयारी असल्याचं वक्तव्य केलं होतं. आता संजय राऊतांनीही स्वबळाची भाषा केलीय. त्यामुळं स्वबळाची भाषा करून संजय राऊत मविआलाच अंतर्गत इशारा तर देत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झालीय.

अहमदनगरमध्ये निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला राम शिंदे यांचा जोरदार धक्का 

अहमदनगरमध्ये निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला राम शिंदे यांनी जोरदार धक्का दिलाय.. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे आणि मविआचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात पक्षप्रवेश होणार आहे. यापक्षप्रवेशमुळे आमदार रोहित पवारांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x