www.24taas.com, नवी दिल्ली
संसद हल्ल्यातील मास्टरमाईंड अफजल गुरू याला आज जरी फाशी दिली तरी तो रात्रभर झोपलाच नव्हता. तो फाशीच्या भितीने जागाच होता. फाशी देणार असल्याचे कळविल्यानंतर त्याची चुळबूळ सुरू होती. त्याने कुराण वाचले आणि सकाळी तो फाशीला सामोरा गेला.
भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अफझल गुरूला बेडया ठोकण्यात आल्या होत्या. आपण हल्ला केल्याची कुबली त्याने माध्यमांकडे दिली होती. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती. मात्र, फाशी होणार या भितीने तो अशांत होता. फाशी होणार असल्याचे समजतात तो चांगलाच हादरला. त्यांने रात्र जागून काढली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अफजल गुरूच्या तपासणीसाठी पहाटे जेल अधिकारी डॉक्टरांच्या पथकासह गेले. त्यावेळी अफजल जागाच होता. फाशी होणार या भितीने बैचेन असलेला गुरू जेलच्या कर्मचाऱ्यांकडून सतत पाणी मागून घेत होता. जेलच्या अधिकाऱ्यांनी त्याला शेवटची इच्छा विचारताच त्याने कुराण मागितले.
अफजलला जेलच्या अधिकाऱ्यांनी कुराण उपलब्ध करून दिले. कुराण वाचल्यानंतर अफझलने पुन्हा पाणी मागितले. त्यानंतर त्याला तिहार जेलच्या बराक क्र. ३ मध्ये फाशीसाठी नेण्यात आले. सकाळी ८ वाजता त्याला फाशी देण्यात आली.
फाशीनंतर जवळपास काही मिनिटे अफझल तडफडत होता. त्यानंतर त्याने प्राण सोडल्याचे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांनी अफझलला मृत घोषित केले.
स्पीड पोस्टने गुरूच्या घरी माहिती
अफझल गुरूच्या फाशीची तारीख ठरल्यानंतर त्याबाबत त्याच्या घरच्यांना स्पीड पोस्टने माहिती देण्यात आली होती. जेलमार्फत ही माहिती देण्यात आली. अफझलच्या कुटुंबीयांनी अफझलला भेटण्याची इच्छा होती असे सांगत फाशीनंतर कांगावा केलाय. तर अफझलच्या भावाने फाशीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नसल्याचे म्हटलेय.