www.24taas.com, मुंबई
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची वर्षावर बैठक झाली. या बैठकीत ६० आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलाय पण या बैठकीला अशोक चव्हाण आणि नारायण राणे हे दोघे नेते मात्र अनुपस्थित होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणच कायम राहणार असल्याचे संकेत दिल्लीकडूनही मिळालेत.
अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर वर्षावर काँग्रेस आमदारांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या ६० आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाय. त्याचबरोबर राष्ट्रवादीची राजकीय नाकाबंदी करणारे निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हटवू नये, अशी मागणी आता काँग्रेस आमदार करु लागलेत.
तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड सातत्यानं पृथ्वीराज चव्हाणांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्याच्या दिवसापासूनच मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, असे संकेत दिल्लीतून मिळत होते. मुख्यमंत्री हटवण्यासाठी राष्ट्रवादीनं कितीही दबाव आणला तरीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पदावर कायम ठेवणार असल्याचं काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाची परवानगीही मिळवलीय. त्यामुळे मिस्टर क्लीन असलेल्या चव्हाणांची मंत्रिमंडळातली साफसफाई सुरूच राहील आणि मंत्रिमंडळातल्या भ्रष्ट मंत्र्यांनाही घरचा रस्ता धरावा लागेल, अशी शक्यता आहे.