दादांचा राजीनामा काकांनी स्वीकारला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 27, 2012, 01:48 PM IST

www.24taas.com,मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय भूकंप झाला. त्यामुळे सरकार जाणार की राहणार याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला कोणताही धोका नाही, असे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, आज अजित पवारांचा राजीनामा काका शरद पवार यांनी स्वीकारला आणि राजीनामा नाट्यावर पडदा पडला आहे.
अजितदादांचा राजीनामा मागं घेण्याची शक्यता मावळलीये. अजितदादांचा राजीनामा स्वीकारण्यात आलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी ही माहिती दिलीये. इतर मंत्र्यांचे राजीनामे मात्र फेटाळण्यात आलेत. राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता मुंबईत होतेय.
या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. अजितदादा राजीनामा मागं घेतील की काय हा सस्पेंस मात्र आता संपल्यात जमा झालाय. अजितदादांचा राजीनामा नक्की असून त्यांच्यावर आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये
उपमुख्यमंत्रिपदी आर.आर.पाटील की जयंत पाटील यांची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नवा उपमुख्य़मंत्री नाही, असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यामुळे नवा उपमुख्यमंत्री असणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार आज कोल्हापूर दौ-यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आमदारांनी राजीनामे दिले तर ते स्वीकारायचे नाही, असे पक्षाचे धोरण ठरले होते. अजित पवार समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करीत जोरदार घोषणाबाजी केली होती. काँग्रेसला खिंडीत पकडण्याचा डाव असल्याची चर्चाही होती. त्यामुळं राष्ट्रवादीचे काँग्रेसवर दबावतंत्र सुरूच असल्याचं चित्र होते. मात्र, काकांनीच पुतण्याचा राजीनामा स्वीकारल्याने काँग्रेसपुढील पेच संपला आहे. वेट अॅण्ड वॉचची भूमिका काँग्रेसच्या पथ्यावर पडली आहे.