पंढरपूरला जायचंय... मग, ही सोय तुमच्यासाठीच!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी नाशिक विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी ३०० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 8, 2013, 10:54 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील यात्रेसाठी नाशिक विभागातून पंढरपूरला जाण्यासाठी ३०० जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलीय.
पंढरपूर येथे १४ ते २३ जुलैपर्यंत होणाऱ्या या यात्रेसाठी नाशिक विभागातील नाशिकसह मालेगाव, मनमाड, सटाणा, नांदगाव, सिन्नर, लासलगाव, इगतपुरी, कळवण, पेठ, येवला, पिंपळगाव बसवंत, चांदवड, निफाड, त्र्यंबक, भगूर, नामपूर, घोटी, दिंडोरी आदी बस स्थानकांमधून जादा ३०० बसेसची सोय करण्यात आलीय. या यात्रेसाठी ग्रामीण भागातून ४० ते ५० भाविकांनी एकत्रितरीत्या मागणी केल्यास त्यांना त्यांच्या गावापासून ते थेट पंढरपूरपर्यंत प्रवासभाडे आकारून बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच परतीच्या प्रवासासाठी आगाऊ बसची बुकिंग त्यांच्या जवळच्या आगारात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळानं दिलीय.
यात्रेसाठी विभागातील प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार बस चालविण्यात येणार आहे. भाविकांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आगारात विचारपूस करावी. प्रवाशांच्या सोयीसाठी १४ ते १८ जुलैपर्यंत खास स्वतंत्र वाहतूक नियत्रंण कक्ष, ध्वनिक्षेपण यंत्रणा व वाहतूक कर्मचारी अशा सुविधा २४ तास कार्यरत असेल. नाशिक विभागासाठी पंढरपूर येथील चंद्रभागानगर बसस्थानक निवारा क्रमांक ८ उपलब्ध करून देण्यात आलाय.

विभागातून यंदा नाशिकच्या आगार क्रमांक १ मधून ४०, आगार क्रमांक २ मधून ६, मालेगाव येथून ३४, येवला, लासलगाव, पिंपळगाव बसवंत येथून प्रत्येकी २०, सटाणामधून ३२, सिन्नर व नांदगाव येथून २२, इगतपुरीहून १५, कळवण येथून ३०, पेठमधून १९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेस जाताना कॉलरा प्रतिबंधक लस टोचून त्याचा दाखला सोबत ठेवणे आवश्यक आहे. लस टोचण्याची व दाखला देण्याची सुविधा जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.