नेत्यांना खरोखरच साहित्यसेवेची काळजी आहे?

साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वाढता वावर आता अनेकांच्या टीकेचा विषय होऊ लागला आहे... यंदाचं चिपळूण साहित्य संमेलनही त्याला अपवाद असणार नाही.

Updated: Jan 4, 2013, 03:09 PM IST

www.24taas.com, मुंबई
साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वाढता वावर आता अनेकांच्या टीकेचा विषय होऊ लागला आहे... यंदाचं चिपळूण साहित्य संमेलनही त्याला अपवाद असणार नाही... यंदाच्या कार्यक्रमपत्रिकेवरून एक नजर टाकली, तरी हे सहज लक्षात येईल... आजकाल गल्लीतल्या गणपतीपासून ते साहित्य संमेलनांपर्यंत कोणताही उत्सव राजकारण्यांचा खुला वावर असतो...
आता तर साहित्य संमेलनांमध्ये साहित्यिकांपेक्षा नेत्यांनाच अधिक महत्त्व असल्याचं कधीकधी दिसून येतं... त्यामुळे ही संमेलनं साहित्याची साधक-बाधक चर्चा करण्यासाठी की नेत्यांना मिरवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय... राजकारण्यांच्या सहभागाला विरोध असायचं कारण नाही, पण यशवंतराव चव्हाणांसारखे वाचनाची खरोखर आव़ड असणारे किती नेते आहेत, याचाही एकदा आढावा घ्यायला हवा, असं बोललं जातंय.
नेत्यांना साहित्यसेवेची खरोखर काळजी असेल, तर मराठी पुस्तकं मिळणारी दुकानं राज्यात मोठ्या संख्येनं सुरू व्हावीत, यासाठी प्रयत्न झाला असता. राज्यात मराठी पुस्तकांची केवळ 80 ते 90 मोठी दुकानं आहेत. 19 जिल्ह्यांत पुस्तकाचं एकही दुकान नाही... मुंबईत इंग्रजी पुस्तकांची 65 दुकानं आहेत, तर मराठी पुस्तकं मिळणारी केवळ 8 ते 9 दुकानंच आहेत...
विदर्भात केवळ 3 जिल्ह्यांत मराठी पुस्तकं विकत मिळू शकतात. पश्चिम महाराष्ट्रात केवळ पुणे, कोल्हापूर, नगर आणि सोलापूरात मराठी पुस्तकांची दुकानं आहेत. मराठवाडा, खान्देश आणि कोकणची स्थिती यापेक्षा वेगळी नाही... संमेलनांमध्ये साहित्याचा उदोउदो होत असताना हे विदारक वास्तव बदलण्यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसत नाहीयेत...