www.24taas.com, कराची
ग़झल गायकीचे बादशाह मेहदी हसन यांचं दीर्घ आजारानं कराचीत निधन झालंय. ते 85 वर्षांचे होते. मागील 12 वर्षांपासून त्यांना फुफ्फुसाच्या विकारानं ग्रासलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला होता.
त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या तीन दिवसांपासून हा आजार त्यांच्या संपूर्ण शरिरात बळावला होता. त्यांच्या लघवीमधून रक्त यायला लागलं होतं तसंच एक-एक करून त्यांच्या अवयवांनीही काम करणं बंद केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना फुफ्फुसाचा आजार जडावला होता. पण, त्यानंतर काही दिवस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हं दिसली. उपचारासाठी त्यांना भारतात आणण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. राजस्थानमध्ये त्यांच्या वडिलांच्या पारंपरिक घर आहे.
रंजीश ही सही...दिल ही दुखाने के लिए आ, पत्ता पत्ता बुटा बुटा इत्यादी अजरामर गझला गझलप्रेमी कधीच विसरू शकत नाहीत. ही गझल ज्यांनी गायली ते गझलकिंग मेहदी हसन आज आपल्यात नाहीत.कलाकार घराण्यात जन्मलेल्या मेहदी यांच्या जवळपास पंधरा पिढ्या संगीत क्षेत्रात होत्या. 18 जुलै 1927 साली त्यांचा राजस्थानातील झुंझूनू जिल्ह्यातल्या लूणा गावात जन्म झाला.
फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. 1957 साली ठुमरी गायक म्हणून त्यांना पाकिस्तान रेडिओमुळं ओळख मिळाली. तिथून त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. पाकिस्तानात गेल्यानंतर काही दिवस त्यांनी मॅकेनिक म्हणून काम केलं. पण, संगीताची ओढ मात्र काही कमी झाली नाही. पाकिस्तान रेडिओसाठी त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली ती १९५७ साली... ठुमरीनं त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याकाळी गझलगायनामध्ये उस्ताद बरकत अली खान, बेगम अख्तर आणि मुख्यार बेगम यांची नावं आघाडीवर होती. हळूहळू ते गझल गायनाकडे झुकले. आपल्या आवाजानं त्यांनी प्रेक्षकांवर अशी काही मोहिनी घातली की त्यांना ‘शहनशाह ए गझल’ म्हटलं जाऊ लागलं. ८०च्या दशकापासून मेहदी हसन दीर्घ आजारी असल्यामुळे प्रेक्षकांना मात्र या आवाजाला मुकावं लागलं होतं.भारतातच नाही तर जगभरात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्या गझला आजही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. रॅप आणि जॅझ अशा आधुनिक संगीत प्रकाराच्या युगातही मेहदी हसन यांची गझल लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या गझलनवाजाला www.24taas.comची भावपूर्ण श्रद्धांजली