www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
`चाईल्ड लाईन` या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं छापा मारून औरंगाबादमधील एका ज्यूस कंपनीमधून चिखलठाणा पोलिसांनी ७५ बाल मजुरांची सुटका केलीय. या मुलांमध्ये बहुतांश मुलं ही गडचिरोली तसंच परराज्यातील असल्याचं समोर आलंय.
औरंगाबादमधील पैठण रोडवर एलेना फ्रुट ज्यूस कंपनीमध्ये बाल मजुरांकडून काम करवून घेत असल्याचा निनावी फोन ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेला आला. त्यानुसार ‘चाईल्ड लाईन’ या संस्थेने चिखलठाणा पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरा ज्यूस कंपनीवर छापा मारला असता तेथे ८१ मजूर काम करताना आढळले. यामध्ये ७५ मुले जणं ही १४ ते १८ या वयोगटातील अल्पवयीन मुलं होती. त्यानुसार पोलिसांनी आणि ‘चाईल्ड लाईन’च्या कार्यकर्त्यांनी ७५ मुलांची सुटका केली. कंपनीत पिळवणूक केल्याचं मुलांनी सांगितलं. मुलांच्या कमाईचा मोठा हिस्सा दलालांना देण्यात येत असल्याचंही स्पष्ट झालंय.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व मुलांना बालकल्याण समितीने औरंगाबादमधील विविध सामाजिक संस्थाकडे सुपूर्द केलंय. कंपनीच्या मालकाविरुद्ध चिखलठाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.