www.24taas.com , झी मीडिया, औरंगाबाद
स्वाईन फ्लूनं पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस सध्या दहशतीखाली दिसतायेत. आयुक्तलयातला अधिकारी असो किंवा शिपाई प्रत्येक जण चेहऱ्यावर मास्क लावून फिरताना दिसतोय. ही दहशत आहे ‘स्वाईन फ्लू’ची... आयुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लू झाला आणि सगळ्यांचंच धाबं दणाणलं.
औरंगाबाद आयुक्तालयातल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना ‘स्वाईन फ्लू’ची लागण झालीय. तर 15 जण तापामुळं सुट्टीवर आहेत. त्यामुळं सध्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना ‘स्वाईन फ्लू’ची दहशत सतावतीय. आयुक्तालयाच्या गेटपासून ते थेट अधिकाऱ्यांच्या केबीनपर्यंत सर्वच मास्क लावून फिरत आहेत. दक्षता म्हणून सर्वांनाच काळजी घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महत्वाचं काम नसेल तर कुणीही आयुक्तालयात फिरकू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातही सध्या ‘स्वाईन फ्लू’ची परिस्थिती गंभीर आहे. आतापर्यंत 35 जणांचं सॅम्पल टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. ‘स्वाईन फ्लू’मुळं सात ऑगस्टला एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. तर एका पेशंटची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी. तसंच सतत ताप येत असल्यास दुर्लक्ष करु नये, असं आवाहन प्रशासनानं केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.