www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा
जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
गुजरात, इंदूरमधल्या बाजारातून हलक्या प्रतीचे विद्युतमोटार पंप आणि पाइप ठोक दराने विकत घेऊन हे सरकारी योजनेतील असल्याचं भासवून शेतकऱ्यांना विकण्यात आलेत. हे पंप विहिरीवर लावले त्यावेळी लगेचच ते जळाल्याने हे निर्कृष्ट दर्जाचे असल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. आणि फसवणूक झाल्याचंही त्यांना कळलं. जिल्हा परिषद पंचायत समितीमधील काही सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या सदस्यांनी हा गैरप्रकार केल्याचा आरोप होतोय.
जिल्हा परिषदेनं कुठलेही कृषी पंप वाटलेले नाहीत. जे सदस्य कृषी पंप वाटप करत आहेत त्यांच्याशी काहीही संबध नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पोलीसात तक्रार करावी, असं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. निकृष्ट दर्जाचा कृषी पंप बाजारात ३, ५०० ते ४, ००० रुपयाला मिळतो. हा कृषी पंप शेतकऱ्यांना ९, ५०० ते १०,००० रुपयांना काही सदस्यांनी विकला आहे. जवळपास ४ ते ५ हजार शेतकऱ्यांना असे कृषी पंप विकण्यात आलेत. या प्रकरणात जिल्हा परिषदेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राकाचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी असल्याने शेतकऱ्यांनी न्याय तरी कोणाला मागायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.