खासदारसाहेब, कदाचित शिवसेनाप्रमुखांनी `खैर` केली नसती

औरंगाबाद शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे एका कार्यक्रमात पाय धरत नमस्कार केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Updated: Jan 19, 2014, 07:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबाद शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे एका कार्यक्रमात पाय धरत नमस्कार केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
काँग्रेसच्या व्यासपिठावर हे चित्र तेवढं आश्चर्यकारक वाटलं नसतं, मात्र शिवसेनेच्या व्यासपिठावर हे चित्र शिवसैनिकांना निश्चितच किळसवाणं वाटतंय. कारण लाचारी, चापलुसी हा प्रकार मान्य नसणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या व्यासपिठावर हा प्रकार घडलाय.
यावर पक्षाच्या नेत्या नीलम गो-हे यांनी प्रतिक्रिया देणे टाळलं आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतांना आम्ही त्यांचा पाया पडायचो, मात्र सभेच्या ठिकाणी त्यांना पाया पडलेला आवडत नव्हतं, मुळात त्यांना पाया पडणं आवडायचं नाही.
शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी आहेत, असाच तो एक सूर होता. मात्र खैरेंचं काय झालं मला माहित नाही, यावर आपण बोलू इच्छीत नसल्याचं नीलम गो-हे यांनी म्हटलं आहे.
चंद्रकात खैरे हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, ते शिवसेनेकडून तीन वेळेस खासदार म्हणून निवडूनही आले आहेत. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेतही नेत्यांनी चापलुसी सुरू केली आहे, मात्र ही चापलुसी शिवसेनेला घराणेशाहीच्या मार्गाकडे नेणार नाही, याचे भान शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना ठेवावं लागणार आहे.
शिवसेनेने काँग्रेसला घराणेशाहीच्या मुद्यावर नेहमीच टीकेचे बाण मारून घायाळ करून ठेवले आहे. मात्र काँग्रेसच्या लोकांनी आता शिवसेनेकडे घराणेशाही सुरू आहे, असा हात दाखवायची जागा शिवसेना नेत्यांनी नकळत का असेना, पण करून दिली आहे.
चंद्रकांत खैर यांनी आदित्य ठाकरे यांचा पाया पडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आदित्य ठाकरेंनी नको, म्हणून हस्तांदोलन करून वेळेंचं भान राखलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.