www.24taas.com, झी मीडिया, येवला
बल्हेगाव येथील आबासाहेब जमधडे यांनी एका महिन्यात कोथिंबीरीचं पीक घेऊन 10 गुंठ्यातून सुमारे एक लाखांचं उत्पन्न घेतलंय. अत्यल्प पाण्यावर घेतलेलं हे पीक जमधडे यांना यंदाच्या हंगामात बोनस ठरलंय.
कमी खर्च आणि अत्यल्प पाण्यावर येणारं पीक म्हणजे कोथिंबीर. शहराजवळ शेती असणा-या शेतक-यांसाठी हे पीक जणू वरदानच ठरतंय. बल्हेगावात रहाणा-या आबासाहेब जमधडे यांनी या पिकाचा पुरेपुर फायदा करून घेतलाय. जमधडे गेल्या चार वर्षांपासून हे पीक घेताहेत. यंदा त्यांनी दहा गुंठ्यात कोथिंबीरीचं पिक घेतलं.
लागवड करताना त्यांनी विक्रीच्या सोईनं चार टप्प्यांत कोथिंबिरीची लागवड केली. सात एप्रिल रोजी त्यांनी गादीवाफे पाडून त्यात बदामी जातीचे गावरान बीयाणे लावले... पाणी देण्यावर अधीक खर्च न करता पारंपरिक पद्धतीनच पाणी दिलं.. चार गुंठे क्षेत्रावर त्यांना बियाण्याला पंधरा हजार, पोषक फवारणीला दोन हजार तर मजुरीसाठी तीन हजारांचा खर्च आलाय..
आबासाहेब जमधडे हे पीक 45 दिवसांतच काढणीला येतं. त्यामुळे जमधडे यांच्या शेतातील कोथिंबीर आता बाजाराच्या वाटेवर आहे.
येवला आणि कोपरगावच्या बाजारात ते कोथिंबिरीची विक्री करतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं बाजारात कोथिंबिरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे यंदा शंभर जुड्यांमागे त्यांना सातशे रुपयांचा भाव मिळतोय. सध्या त्यांच्या तीस-या टप्प्यातील कोथिंबीर विक्रीस तयार झालीये. आतापर्यंत आणि यापूढे निघणा-या पिकातून त्यांना सुमारे एक लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांना आहे.
या पिकासाठी मजुरांची फारशी गरज नसल्यानं कुटुंबातील सदस्यच शेताचं सर्व काम करतात. त्यामुळे मजुरीही वाचतीये.. बाजार भावाचा अंदाज आणि पीकाचं योग्य नियोजन केल्यास अत्यल्प पाणी, अत्यल्प खर्च,, अत्यल्प कालावधीत येणारं आणि भरघोस उत्पन्न देणारं हे पीक शेतक-यांना नक्कीच फायद्याचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.