www.24taas.com, औरंगाबाद
एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तक्रारीत गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत असल्याच्या वारंवार तक्रारी येतात. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात जबरदस्त तत्परता दाखवलीय.
औरंगाबादच्या सिडको पोलिसांनी चक्क भटक्या कुत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तीन शेळ्यांच्या हत्येप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळं सिडको परिसरातली मोकाट कुत्री पोलिसांच्या लेखी वॉन्टेड झालीयेत. सिडको एमआयडीसी परसिसरात एका व्यक्तीच्या तीन शेळ्या मोकाट कुत्र्यांनी ठार केल्या. या नुकसानीची शासन भरपाई मिळावी म्हणून पोलिस पंचनामा आवश्यक होता त्यामुळे या शेळी मालकाने पोलिसांत कुत्र्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर संबंधित ठाणे अंमलदाराने ठाण्याच्या प्रमुखांना याची माहिती दिली वरिष्ठांनी त्यावर कायदेशीर कारवाई करा असा आदेश दिला. साहेबांचा आदेश येताच अंमलदार साहेबांनी आदेशाची पूर्तता करीत शेळी मालकाच्या तक्रारी आधारे कुत्र्यांवर एफआयआर दाखल केली आणि या गुन्ह्याचा तपास हेड-कॉन्सटेबलकडे सोपवला.
पोलीस निरिक्षक ठाण्यात आल्यावर जेव्हा त्यांनी डायरी पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. पोलीस निरिक्षकांनी ही बाब पोलीस आयुक्तांच्या कानीसुद्धा टाकली. पोलीस आयुक्तांनीसुद्धा या गंमतीशीर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस हवालदाराला बोलावून कुत्र्यांच्या तापासाचे काय झाले? असा प्रश्न केला असता तपास सुरु असल्याचे हवालदाराने आवर्जून सांगितले. ठाणे अंमलदाराच्या गोंधळामुळे हा सगळा प्रकार घडलाय. औरंगाबादकरांमध्ये हा विषय गंमतीने चर्चीला जातोय.