www.24taas.com, झी मीडिया, जळगाव
जळगाव महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झालीय. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नसलं तरी सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीला सर्वात जास्त ३३ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेनंही जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी जैन आणि मनसे एकत्र येणार की मनसे-भाजप-राष्ट्रवादीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात येणार याबाबत उत्सुकता आहे.
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं जळगावमध्ये सुरेश जैन यांचीच दादागिरी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. यावेळी मात्र त्यांनी थेट तुरूंगातूनच आपली दादागिरी दाखवून दिलीय.
जैनप्रणीत खान्देश विकास आघाडीला ३३ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला १५ जागांवर विजय मिळालाय. गेल्या निवडणुकीत एका जागेसह महापालिकेत प्रवेश केलेल्या मनसेनं १२ जागांवर मुसंडी मारलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ११ जागांवर समाधान मानावं लागलंय. काँग्रेसला गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही भोपळा फोडण्यात यश आलेलं नाही. इतरांना चार जागा मिळाल्या आहेत.
असं असलं तरी घरकूल घोटाळ्याची छाया काहीप्रमाणात या निवडणुकीवर असल्याचं दिसून आलंय. कारण गेल्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणारी शहर विकास आघाडी खान्देश विकास आघाडीत विलीन झाल्यानंतरही जैन यांना बहुमत मिळवता आलेलं नाही. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागणार आहे. त्याचवेळी मनसेचाही पर्याय जैन यांच्यासमोर आहे. मात्र राज ठाकरे यांच्याशीच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं मनसेनं सांगितलंय.
या निवडणुकीत सत्ताधारी खानदेश विकास आघाडीच्या विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपकडे अनेक मुद्दे होते. मात्र राज्यात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि जैन यांच्याशी हाडवैर असलेल्या विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांना जनतेनं नाकारलंय. त्यामुळं सुरेश जैनच जळगावचे नेते असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केलाय.
मात्र खान्देश विकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर भाजप , राष्ट्रवादी काँगेस आणि मनसेला एकत्र यावे लागेल. त्यामुळं ही शक्यता कितपत वास्तवात उतरेल आणि जैन यांच्या सत्तेला सुरूंग लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.