www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पात्रता नसलेले प्राध्यापक पीएचडीचे मार्गदर्शक बनल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. विशेष म्हणजे 65 संशोधकांच्या बोगस मान्यतेवर कुलूगूरूंचीही मोहोर असल्याची माहितीही मिळतेय. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यानंच हा भंडाफोड केलाय. मात्र या घोळामुळं संशोधनाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणारेय.
येत्या 31 मे पासून 65 गाईड विद्यार्थ्यांना पीचएचडीसाठी मार्गदर्शन करणारेत. मात्र या नियुक्तीमध्ये नियमांना पायदळी तुडवल्याचा आरोप विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीच केलाय. महत्वाचं म्हणजे हे नवीन गाईड अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला, सामाजिक शास्त्र, शिक्षणशास्त्र या शाखांसाठी निवडण्यात आलेत.
नेमके गाईड होण्याचे निकष काय आहेत पाहूयात. पदवी, पदव्युत्तर, अध्यापनाचा 7 आणि 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. पीएच.डी मिळवल्यानंतर 3 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाच रिसर्च पेपर या गाईडसचे प्रसिद्ध असावे तसंच दोन संदर्भ पुस्तिकाही प्रकाशित होणं आवश्यक आहे. मात्र निवड झालेले 65 गाईड्स या कुठल्याही नियमात बसत नाहीत. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचाही आरोप या सदस्यांनी केलाय.
यासंदर्भात कुलगुरूंशी बोलण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी बैठकीची सबब सांगत कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी संचालकांकडे बोट दाखवलं. संचालकांनीही नियुक्तीत घोळ असल्याचं मान्य केलं.. मात्र चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं थातूरमातूर आश्वासन देत वेळ मारून नेली..
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन दर्जाहीन असल्याचा नेहमीच आरोप करण्यात येतो. कित्येक वर्षांपासून युजीसीचे नियम पाळणं शक्य न झाल्यानं विद्यापीठात संशोधनाचे कामही ठप्प आहे. त्यातच अशा पद्धतीने नियमांची पायमल्ली करून दर्जाहीन गाईड्स नेमले तर या विद्यापीठातील संशोधनाच्या दर्जाचा विचारच न केलेला बरा असा संताप आता विद्यार्थ्यांमधून व्यक्त होतोय..
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.