मयुरेश कडव
mayuresh.kadav@gmail.com
बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा, उपचारांना साहेबांचा चांगला प्रतिसाद, शिवसैनिकांच्या प्रार्थनेला यश, सेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी देवाला साकडं....अशा अनेक बातम्यांनी उभा महाराष्ट्र काल, परवापर्यंत किंबहूना आज दुपारपर्यंत ढवळून निघाला होता. पण शेवटी ती दुदैवी बातमी आलीच आणि उभ्या महाराष्ट्राच्या अश्रूंचा बांध फुटला...
आमच्या पिढीचं दुर्दैवं आम्ही अत्रे पाहिले नाहीत. अण्णाभाऊ केवळ पुस्तकातूनच अनुभवायला मिळाले. महाराष्ट्राच्या तोफा आमच्या पिढीला काही कळायच्या आताच काळाच्या पडद्याआड थंडावल्या...आता आहेत ते फक्त शोभेच्या दारूचे फटाके...ज्यातून आनंद मिळतो पण तो केवळ क्षणीक...माझ्या पिढीचं थोडफार नशीब चांगलं म्हणून की काय बाळासाहेबांचे शाब्दिक फटकारे अनुभवता आले. यापुढे सीडी, व्हिसीडीच्या माध्यमातून त्यांची भाषणं ऐकताही येतील. पण शेवटी रेकॉर्डिंगच ते, त्यात नसेल त्यांच्या बुलंद आवाजाची धार, चालू घडामोडींवरचं सडेतोड भाष्य आणि बाळासाहेब असल्याचं अस्तित्व…ज्याचे शब्द ऐकण्यासाठी शिवाजी पार्क आसुसलेला असायचा, ज्याची एक झलक पाहण्यासाठी डोळे आतुरतेनं व्याकूळ झालेले असायचे असा नेता आता कधीच दिसणार नाही ही गोष्टच मनाला न पटणारी आहे. खरच असा महान नेता होणे नाही...
देशातली सध्याची स्थिती पाहिली तर असा एकही पक्ष नाही की ज्यांनी ख-या अर्थानं शुन्यातून माणसं घडवली...काहींनी घडवली असतीलही कदाचित पण बाळासाहेबांइतकी नाहीच...म्हणूनच कदाचित साहेबांच्या मृत्यूनंतर छगन भुजबळ, नारायण राणेंनाही अश्रू अनावर झाले. चाळीत राहणा-या माणसाला मुंबईचा महापौर करणं असो किंवा शिपायाची नोकरी करणा-याला नगरसेवक बनवणं हे केवळ बाळासाहेब आणि बाळासाहेबच करू शकले. आजही इतर पक्षांच्या तुलनेत शिवसेनेतील नेते, नगरसेवक, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळ्यांची पार्श्वभूमी तपासून पाहिली तर याचा प्रत्यय नक्कीच येईल. यात मग कुणी कोकणातल्या मातीत हातावर पोट असेलेल्या कुटुंबात जन्मलेला असेल तर कुणी विदर्भ, मराठवाड्यातल्या भेगाळलेल्या जमिनीत अपार कष्ट सोसून आलेला...कारण बाळासाहेबांकडे आपल्याकडे असलेलं दुस-याला देण्याची वृत्ती होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत कायम जपली. म्हणूनच मला शिवसेनेबद्दल कायम आदर वाटतो.
राजकारण करत असतांना उन्नीस-बीस होतच असतं. पण जेंव्हा तुम्ही इतरांना शुन्यातून घडवता, भरभरून देता तेंव्हाच तुम्ही ख-या अर्थानं नेता होता, लोकांच्या गळ्यातील ताईत बनता..हे सारं काही बाळासाहेबांकडे होतं. म्हणूनच बाळासाहेब सर्वोच्च पदावर जाऊन पोहचले...वक्तृत्व, शाब्दिक कोट्या, व्यंगंचित्र, मनमिळावू स्वभाव आणि या सर्वांहून महत्वाचं म्हणजे रोखठोक वृत्ती यातच या नेत्यानं माणसं जिंकली. आठ-दहा महिन्यांपूर्वी पत्रकरांशी एका कार्यक्रमात संवाद साधतांना त्यांनी जाहीरपणे सांगितलं. मी एकदा बोललो की बोललो...मग माघार नाही.. त्यांचा हा बिनधास्तपणाच त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेला.
एखादी भूमिका पटली नाही तर केवळ मैत्रीखातर त्याचं फाटकं समर्थन करून संबंध जपण्याचं नाटक त्यांना कधीच जमलं नाही. म्हणूनच अनेकदा मित्रपक्ष भाजपलाही त्यांच्या शब्दांचे वार झेलावे लागले. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जाहीरपणे मतदारांवर आगपाखड करणारा भारतातील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब....मतदारांवर टीका केली म्हणून आपली व्होट बँक कमी होईल. मतदार दुरावतील याची त्यांनी कधीच चिंता केली नाही. असं धारिष्ट्य एखाद्या योध्यामध्येच असतं आणि ते बाळासाहेबांमध्ये होतं...मला लहानपणापासूनच या नेत्याचं कौतुक होतं...
लहानपणी आमच्या भागातील जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं दादा कोंडकें वांगणीत येत. वांगणीत झालेल्या त्यांच्या दोन जाहीर सभांना हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी मी सहावी-सातवीत असेन, राजकारण कळतही नव्हतं केवळ दादांना पहायला म्हणून आम्ही मुलं जात असू....पण दादा कोंडकेंना बाळासाहेबांबद्दल अपार प्रेम, नेमका त्याचवेळी बाळासाहेब विरूद्ध शरद पवार संघर्ष शिगेला पोहचलेला होता. तेंव्हा दादा कोंडके बाळासाहेबांची नक्कल करून ते काँग्रेसला कसा धडा शिकवतील हे इतक्या विनोदी बुद्धीनं सांगत की माझ्य मनात बाळासाहेबांबद्दल प्रचंड कुतुहूल निर्माण झालं होतं.
प्रत्यक्षात बाळासाहेबांना जवळून पाहिलं ते ठाणे महापालिकेच्या २००७ साली ठाणे महापालिकेच्या निवडणुकीदरम