बाळासाहेबांचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याशेजारी?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीवर दिलेली जागा आहे. ही लीज संपलेली असल्यानं त्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 25, 2012, 05:19 PM IST

www,24taas.com,मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीवर दिलेली जागा आहे. ही लीज संपलेली असल्यानं त्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं.
हा प्रस्ताव उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांना दिला जाईल. शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर ही जागा आहे. पार्कात ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अग्नीसंस्कार झाले, तिथं एक चबुतरा बांधण्याचाही प्रस्ताव आहे. हे प्रस्ताव शिवसेनेला मान्य झाल्यास गेला आठवडाभर गाजलेल्या स्मारकाच्या वादावर पडदा पडू शकतो.
बाळासाहेबांचे स्मारक ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा मिळालेल्या महापौर बंगल्याच्या भव्य वास्तूत योग्य पद्धतीने जतन केले जाऊ शकते असे मत महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच हा प्रस्ताव महापालिकेकडून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांपुढे सादर केला जाणार आहे.
बाळासाहेबांच्या निधन होऊन काही दिवस उलटले नाही तोच त्यांचे स्मारक उभारण्यावरून आणि अनेक ठिकाणांना त्यांचे नाव देण्यावरून राजकारण सुरु झाले. चर्चगेट स्टेशनला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या नगरसेविका नयना शेठ यांनी दादर स्टेशनला बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केली आहे.